दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तहसीलवर भव्य मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग, राष्ट्रपती-पंतप्रधानांना निवेदन
माहूर, प्रतिनिधी:
माहूर :दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ गुरुवारी माहूर शहरात विविध विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, युवक, शेतकरी व नागरिक सहभागी झाल्याने शहरातील प्रमुख मार्ग आंदोलनकर्त्यांनी गजबजून गेले.
मोर्चादरम्यान “तानाशाही नाही चालणार”, “शिक्षण वाचवा, संविधान वाचवा”, “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “लोकशाहीचा गळा घोटणारे सरकार मुर्दाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी हातात संविधानाच्या प्रती, मागण्यांचे फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध नोंदविला.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत वक्त्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध करत शिक्षणाचे कथित व्यापारीकरण, वाढती बेरोजगारी, शिष्यवृत्तीचे प्रश्न, शिक्षणावरील वाढता आर्थिक भार आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर होत असल्याचा आरोप असलेल्या हस्तक्षेपावर केंद्र सरकारवर टीका केली.
यावेळी एका प्रमुख वक्त्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत, “२०१४ नंतर देशात लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीची प्रवृत्ती वाढत आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणारे आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाच अडथळे निर्माण करत आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की ‘ना पढूंगा, ना पढने दूंगा’ हेच सरकारचे धोरण असल्याचे चित्र दिसत आहे,” असा आरोप केला. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचेही त्यांनी म्हटले.

इतर वक्त्यांनीही विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचा सन्मान करण्याची मागणी केली.मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी माहूर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना उद्देशून मागण्यांचे निवेदन सादर केले.या आंदोलनात नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष ज्योतिबा खराटे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कॉ. किशोर पवार, कॉ. बाबा डाखोरे, कॉ. शंकर सीडाम, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सईद अली,किसान ब्रिगेड चे अविनाश पाटील,यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ माहूरमध्ये निघालेल्या या मोर्चामुळे विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि सामाजिक संघटनांची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून दिवसभर या आंदोलनाची शहरात व्यापक चर्चा रंगली.

