यवतमाळ–माहूर–किनवट रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी; खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट

विदर्भ–मराठवाडा जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी निधी व प्रशासकीय मंजुरीची मागणी

माहूर, प्रतिनिधी:

यवतमाळ, आर्णी, हिवरा, माहूर आणि किनवट या भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडणाऱ्या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी देऊन आगामी रेल्वे अर्थसंकल्पात आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे.

यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी या रेल्वे मार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांना जोडणारा हा मार्ग अनेक ग्रामीण भागांसाठी विकासाचा नवा मार्ग ठरू शकतो. या परिसरातील नागरिकांना अद्यापही थेट रेल्वे सेवेचा लाभ मिळत नसल्याने प्रवास, शिक्षण, रोजगार आणि व्यापाराच्या संधींवर परिणाम होत आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना कृषीमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचविणे शक्य होईल. वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योग, व्यापार आणि रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

माहूर हे श्री रेणुका देवी शक्तिपीठ तसेच भगवान दत्तात्रेयांच्या पवित्र स्थानामुळे देशभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ होईल, असा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला.

या रेल्वे मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण, प्रशासकीय मंजुरी आणि पुढील प्रक्रिया लवकर पूर्ण करून विकास योजनांमध्ये या प्रकल्पाचा समावेश करावा, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks