‘झन्ना-मन्ना’ जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा, रोख रक्कम, पाच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात..
माहूर , प्रतिनिधी :
माहूर : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला सिंदखेड पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. मौजे गोंडवडसा येथील गोंडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करत पोलिसांनी दोन लाख अठ्ठावीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत दि. २० जुलै २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व त्यांचे पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत गोंडवडसा परिसरात सार्वजनिक मोकळ्या जागेत काही व्यक्ती “झन्ना-मन्ना” नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
माहितीची शहानिशा करून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी अचानक धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद नूर अब्दुल रज्जाक (वय ६० वर्षे), राहुल केशव साबळे (वय २७ वर्षे), अन्सार खान अजीम खान (वय ३८ वर्षे), शेख एजाज शेख फयाज (वय ३९ वर्षे) आणि शेख इरफान अब्दुल रहीम (वय ३४ वर्षे) यांचा समावेश असून सर्वजण गोंडवडसा (ता. माहूर) येथील रहिवासी आहेत.
आरोपींची अंगझडती आणि घटनास्थळाची तपासणी केली असता रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच पाच मोटारसायकली असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिंदखेड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर विभाग आणि मा. किरण भोंडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोउपनि संग्राम मुंडे तसेच पोलीस अंमलदार कांबळे, पवार, इंगळे, नरवाडे आणि कुमरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अवैध धंद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र…
जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जुगार, अवैध दारू, रेती तस्करी व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात नांदेड पोलीस यापुढेही अधिक कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
