वाई बाजार येथे गोदावरी बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी.

बँक शाखेमुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आर्थिक सुविधा; रोजगार निर्मितीलाही चालना

माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिक तथा जिल्हा परिषद गटाचे प्रवक्ते पिंटू उर्फ लक्ष्मीकांत कदम पाटील यांनी संस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांच्याकडे दि.३० रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

वाई बाजार हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी पेठ व कृषी असून येथे दररोज शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारासाठी येत असतात. मात्र, परिसरात बँकेची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो.

निवेदनात वाई बाजार येथे गोदावरी बँकेची शाखा सुरू झाल्यास नागरिकांना ठेवी, बचत खाते, कर्ज सुविधा, शेतकरी कर्ज, महिला बचत गटांसाठी आर्थिक सहाय्य तसेच विविध शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध होईल. याशिवाय व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील, तर शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर बँकिंग सेवा वेळेत मिळू शकतील.

तसेच बँकेची शाखा सुरू झाल्याने स्थानिक सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना गती मिळून व्यापार व उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. परिणामी परिसराच्या आर्थिक विकासाला बळकटी मिळण्यास मदत होईल.

वाई बाजार व परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने शाखा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पिंटू पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बँकेची शाखा सुरू झाल्यास हजारो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks