सतर्क नागरिक आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश.

बसमधून हरवलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण अवघ्या काही वेळात शोधून काढले.

माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे हरवलेले अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सजगतेमुळे अवघ्या काही वेळात शोधून काढण्यात आले. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबरोबरच समाजातील प्रामाणिकपणाचेही दर्शन घडले.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एक महिला माहूर गडावरील दत्तशिखराचे दर्शन घेऊन वाई बाजारजवळील मदनापूर येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी माहूर बसस्थानकावरून अमरावती–किनवट बसने प्रवास करत होती. बसमध्ये चढताना तिच्या गळ्यात दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण होते. मात्र वाई बाजार येथे उतरण्याच्या तयारीत असताना तिच्या लक्षात आले की गळ्यातील गंठण हरवले आहे.

गंठण हरवल्याचे समजताच महिलेने हंबरडा फोडला. यावेळी वाई बाजार बसस्थानक परिसरात उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, निवृत्त आरोग्य कर्मचारी रमेश गावंडे, विनोद राठोड, निखिल जाधव आणि अत्रिनंदन शिंदे यांनी तत्काळ धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली.

स्थानिक नागरिकांनी बस वाहकाच्या मदतीने बस थांबवून ठेवली आणि सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करून बस पुढे जाऊ न देण्याचे निर्देश दिले.

काही वेळातच सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि वाई बाजार बिटचे जमादार चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची आणि बसची सखोल तपासणी सुरू केली. सुरुवातीला कोणताही सुगावा न लागल्याने वातावरणात चिंतेचे सावट निर्माण झाले होते. मात्र अखेर बसच्या शेवटच्या सीटजवळ हरवलेले सोन्याचे गंठण आढळून आले. त्यानंतर महिलेसह उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलिसांनी सोन्याचे गंठण संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. पोलिसांची तत्परता, स्थानिक नागरिकांची सामाजिक बांधिलकी आणि वेळेवर घेतलेली दखल यामुळे महिलेचा मौल्यवान ऐवज परत मिळाला. या घटनेबद्दल परिसरात पोलिस व मदतीला धावून आलेल्या नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks