माहूर, प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील मनीराम थड येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीताई पवार व कामिनीबाई ठोसर होत्या. यावेळी पिंटू पाटील, उकंडराव जाधव, संजय राठोड, पुरणसिंग राठोड, राजू कोटूरवार, सुदाम राठोड, अशोक पवार यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी, गावातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर गावातील सार्थक गंधे, जीविका गंधे, शारदा ठोसर आणि ऋतुजा ठोसर या चिमुकल्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी पिंटू पाटील व राजू कोटूरवार यांनी लोकमाता अहिल्यादेवी यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांमधून समाजसेवा, लोकहित आणि सुशासनाचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. विशेषतः महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कार्यक्रमानंतर गावकऱ्यांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठोसर यांनी केले, तर प्रास्ताविक गोकुळ गंधे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यश ठोसर, करण ठोसर, वैभव गंधे, प्रथमेश ठोसर, शिवम ठोसर, समाधान सोनडवले, धम्मपाल नरवाडे, प्रशांत गंधे, सुभाष गंधे, चंदू ठोसर, प्रदीप कापडे, प्रदीप ठोसर, प्रशांत ठोसर, अजय ठोसर, दिलीप ठोसर आणि विनोद ठोसर यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
