
किनवट (मलिक चव्हाण)
प्रवाशांनी दूरच्या प्रवासासाठी दुचाकी अथवा इतर खासगी वाहनांपेक्षा एसटी बसने प्रवास करावा. प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन किनवट आगाराचे आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी केले.
किनवट आगारात एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख अशोक चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक, नगरसेविका अश्विनी जागरलावार, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पहुरकर, मुकुंद नेम्मानीवार, नगरसेविका प्रतिनिधी प्रभू कोल्हे, कार्यशाळा अधीक्षक वाय. एच. खिल्लारे तसेच ज्येष्ठ प्रवासी उपस्थित होते.
यावेळी बसस्थानक परिसरात महिला व ज्येष्ठ प्रवाशांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात राहुल नाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केल्या. तर पत्रकार प्रमोद पहुरकर यांनी किनवट आगारातून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्याची मागणी केली. नगरसेविका अश्विनी जागरलावार यांनी सर्व प्रवाशांना एसटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
एसटी कर्मचारी कोंडे यांनी प्रवाशांना एसटी बस व बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. नांदेड विभागातून किनवट आगाराला प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचा यावेळी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
तसेच सलग १५ वर्षे अपघातमुक्त व सुरक्षित सेवा देणाऱ्या ३१ चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून व पेढे वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार प्रशांत वाठोरे, राज माहुरकर, मलिक चव्हाण, लक्ष्मीकांत मुंडे, शुभम शिंदे, विजय जोशी, संतोष सिसले, वाहतूक अधीक्षक शिलरत्न ढगे, वाहतूक निरीक्षक साईनाथ मुंडे, गंगय्या सटलावार, शंकर ताडेवार, गजेंद्र दासरवार तसेच एसटीचे चालक, वाहक, प्रशासकीय व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष अनंतवार यांनी केले.
