मृग कोरडेच; पेरण्या रखडल्या… मदनापूरमध्ये ‘धोंडी धोंडी पाणी दे रे’ म्हणत पावसासाठी शेतकऱ्यांची याचना


राजिक शेख (कार्यकारी संपादक)

माहूर: मृग नक्षत्र सुरू होऊन ही माहूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.शेतकरी पेरणीसाठी सज्ज असतानाही आवश्यक पाऊस पडला नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून, सर्वांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मदनापूर येथे (दि.१४) ग्रामस्थांनी पारंपरिक ‘धोंडी’ काढून पावसासाठी निसर्गाला साकडे घातले.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी नांगरणी,वखरणी, रोटाव्हेटर आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. सोयाबीन,कापूस,तूर,मूग,उडीद यांसारख्या पिकांसाठी बियाणे आणि खतांची खरेदीही करून ठेवली आहे,मात्र पावसाअभावी शेतजमिनी कोरड्याच असल्याने पेरणीचा मुहूर्त पुढे ढकलावा लागत आहे.अर्धा जून महिना संपायला आला असतानाही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान,ग्रामीण भागात पावसासाठी पारंपरिक लोकपरंपरांचा आधार घेतला जात आहे.मदनापूर येथे गावातील मुले आणि युवकांनी अंगावर कडुनिंबाच्या फांद्या व पाने बांधून ‘धोंडी’ काढली.गावभर फिरत “धोंडी धोंडी पाणी दे रे, शेत आमचं भिजू दे रे” असा गजर करण्यात आला.घराघरांसमोर धोंडी आल्यानंतर ग्रामस्थांनी तिच्यावर पाणी टाकत पाऊस पडावा,शेतीला जीवदान मिळावे आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली.

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘धोंडी’ ही केवळ एक धार्मिक किंवा पारंपरिक प्रथा नसून शेतकऱ्यांच्या आशा,श्रद्धा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानली जाते.या परंपरेत धोंडीच्या अंगावर कडुनिंबाच्या फांद्या बांधल्या जातात.कडुनिंब हा पवित्र व औषधी गुणधर्म असलेला वृक्ष मानला जातो.काही भागांत धोंडीसोबत बेडूक ठेवले जाते.लोकविश्वासानुसार बेडूक हा पावसाचा दूत मानला जात असल्याने त्याचा या परंपरेत समावेश केला जातो.

पूर्वी हवामानाचा अचूक अंदाज उपलब्ध नसताना गावकरी अशा सामूहिक उपक्रमांद्वारे पावसासाठी प्रार्थना करत असत,त्यातून गावातील एकोपा वाढण्याबरोबरच संकटाच्या काळात परस्पर सहकार्याची भावना दृढ होत असे.आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही अनेक गावांमध्ये ही परंपरा जिवंत आहे.

सध्या माहूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून,लवकरच दमदार पाऊस होऊन खरीप हंगामाला सुरुवात व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाच्या विलंबामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाच्या चिंतेत भर पडली असून,मदनापूरमधील ‘धोंडी’ने या प्रतीक्षेला लोकसंस्कृतीची भावनिक जोड दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks