पावसाळ्यात सापांचा संचार वाढतो, शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे.

सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन.

माहूर, प्रतिनिधी

माहूर :पावसाळ्याच्या आगमनासोबतच माहूर तालुक्यात साप व इतर वन्यजीवांचा वावर वाढू लागला असून शेतकरी, नागरिक तसेच सकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन हेल्पिंग हँड्स रेस्क्यू टीम माहूरगडचे सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक मोहन एम. मुर्खे यांनी केले आहे.

पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे ते सुरक्षित ठिकाणांच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे घरांच्या परिसरात, गोठ्यांमध्ये, वाहनांमध्ये, शेतातील बांधांवर तसेच शेतीच्या कामाच्या ठिकाणी साप आढळण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः माहूर तालुका हा गड, किल्ले, दाट जंगल आणि विस्तीर्ण शेती क्षेत्राने वेढलेला असल्याने येथे विविध सर्पप्रजातींचे नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सापांचे दर्शन होणे ही सामान्य बाब असली तरी निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी बांधवांनी शेतात काम करताना पायात बूट, हातात हातमोजे वापरणे, गवत किंवा लाकडांचे ढीग हलविताना काळजी घेणे, रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करणे आणि शेतातील झोपडी किंवा घराभोवती स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तसेच सकाळी लवकर व्यायामासाठी किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी अंधारात चालताना टॉर्चचा वापर करावा. शक्यतो जमिनीवर झोपू नये आणि उंच ठिकाणी झोपण्याची सवय लावावी, असेही त्यांनी नमूद केले.

पावसाळ्यात विषारी तसेच बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मात्र कोणताही साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. साप विषारी आहे की बिनविषारी, हे ओळखणे सर्वसामान्य नागरिकांसाठी अवघड असते. योग्य प्रशिक्षण, अभ्यास आणि अनुभव नसताना सापांच्या जवळ जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे साप आढळल्यास सुरक्षित अंतर ठेवून त्वरित अधिकृत व अनुभवी सर्पमित्रांना माहिती द्यावी, असे आवाहन मोहन मुर्खे यांनी केले.

माहूर परिसरात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे प्रमुख विषारी साप आढळतात. तर धामण, कवड्या, पाणदिवड, कुकरी, गवत्या यांसारख्या अनेक बिनविषारी सर्पप्रजाती देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. साप हे पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून ते उंदीर आणि इतर पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे सापांचे संवर्धन करणे आणि त्यांना विनाकारण इजा न पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारच्या मंत्र-तंत्र, झाडफूक किंवा अंधश्रद्धेच्या उपचारांवर विश्वास न ठेवता तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी जावे. योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

माहूर तालुक्यात कुठेही साप अथवा वन्यजीव आढळल्यास हेल्पिंग हँड्स रेस्क्यू टीमच्या ९९२२३६३५३८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन मदत मागवावी. हेल्पिंग हँड्स रेस्क्यू टीम नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर असल्याचे मोहन मुर्खे यांनी सांगितले.

“प्रकृती रक्षित, तरच जीवन सुरक्षित” या संदेशासह सापांबाबत भीती न बाळगता जागरूकता आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks