चार ते पाच महिन्यांपासून दुसरा-तिसरा हप्ता नाही; संतप्त लाभार्थ्यांचा आक्रोश मोर्चाचा इशारा
माहूर | प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (घरकुल) पात्र लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते मागील चार ते पाच महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक घरकुलांची बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आसोली सह तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. मात्र त्यानंतरचा दुसरा व तिसरा हप्ता अद्याप जमा न झाल्याने घरकुलांचे बांधकाम ठप्प झाले आहे. लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम सुरू करून शासनाच्या सूचनांचे पालन केले असतानाही पुढील निधी न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकामासाठी घेतलेले साहित्य, मजुरांचे देयक तसेच इतर खर्च भागविण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी खासगी कर्जाचा आधार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा अतिरिक्त भार पडत असून आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. दुसरीकडे, पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट बांधकामे कोसळण्याची भीती निर्माण झाली असून जीवित व वित्तहानीचा धोका वाढला आहे.
या संदर्भात पंचायत समिती माहूर येथील गटविकास अधिकारी टाकरस, लेखाधिकारी तसेच संबंधित अभियंता यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून पात्र लाभार्थ्यांची थट्टा केली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
घरकुल विभागातील प्रशासकीय अनागोंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. घरकुल ऑपरेटर वारंवार रजेवर असणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणे तसेच डी.वाय.सी. (DYC) प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. केवळ अर्थपूर्ण दृष्टीकोनातून काही प्रकरणांमध्ये हप्ते देण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
माहूर तालुक्यातील रखडलेले घरकुल हप्ते तात्काळ जमा करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून निधी वितरित न केल्यास बाधित लाभार्थ्यांच्या वतीने पंचायत समिती माहूर कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी तातडीने हस्तक्षेप करून रखडलेले हप्ते मंजूर करावेत व लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया
आसोली येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील काही लाभार्थ्यांच्या घरकुल प्रकरणांमध्ये स्टेटस छायाचित्रे (Geo-tag Photos) अपलोड करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहिले आहेत. संबंधित लाभार्थ्यांची छायाचित्रे प्रणालीमध्ये काही कारणास्तव रिजेक्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, पंचायत समिती स्तरावर रिजेक्ट झालेली छायाचित्रे पुन्हा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण करण्यात येत आहे.सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम लवकरच जमा करण्यात येईल. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता पंचायत समिती प्रशासनाला सहकार्य करावे.
मनोज नरवाडे
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती माहूर

