वारंवार पाठपुरावा, प्रत्यक्ष भेटी आणि ई-मेल तक्रारीनंतरही डीपी उपलब्ध नाही; संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा.
माहूर | प्रतिनिधी
(ता. माहूर) सायफळ शिवारातील शेतीपंपाची इरफान डीपी मागील दोन महिन्यांपासून बंद असून, महावितरणकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची उभी पिके संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांनी दि. १ जून २०२६ रोजी डीपी जळाल्याचा फेल रिपोर्ट महावितरणकडे पाठविला होता. मात्र दोन महिने उलटूनही नवीन डीपी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शंभर टक्के पेरणी पूर्ण केली. त्यानंतर गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. शेतकरी नदी व विहिरीतील पाण्याचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करत असले, तरी डीपी जळाल्यामुळे सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः व्हेंटिलेटरवर आली आहेत.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, भोकर यांच्याकडे वारंवार मागणी केली, प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले तसेच ई-मेलद्वारेही तक्रार दाखल केली. मात्र यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून डीपी बंद असल्याने आमची उभी पिके वाळत आहेत. दोन दिवसांच्या आत नवीन डीपी उपलब्ध करून दिली नाही, तर वाई बाजार येथील महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आमची शेती उद्ध्वस्त झाली तर आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नवीन डीपी बसवावी.
महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी व सायफळ येथील नागरिकांनी तातडीने नवीन डीपी उपलब्ध करून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
