
किनवट | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी किनवट प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बेंदी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वृक्षलागवड व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
हा कार्यक्रम उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहायक वनसंरक्षक (जकास व कॅम्पा) किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) धीरज मदने तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एच. संघई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याची बचत करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनपाल दिनकर सूर्यवंशी, टी. ए. देवकते, बी. टी. जाधव, संजय कोम्पलवार तसेच वनरक्षक गित्ते, बालाजी भुरके, बालाजी झंपलवाड, सुनील खामकर, रवी दांडेगावकर, केशव वानोळे, विठ्ठल मुळे, महेश भोरडे, ओम शिंदे यांच्यासह वाहनचालक अनिल लाखाडे, अंकुश राठोड आणि वेद राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात किनवट प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. रोपवाटिका परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
“वृक्ष लागवड ही काळाची गरज असून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
