
माहूर प्रतिनिधी :
अधिक महिन्याच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण माहूरमध्ये सुरू असलेल्या धोंड्याच्या जेवण व महाप्रसाद उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या पार्श्वभूमीवर परमपूज्य श्री दत्तशिखर संस्थानचे मुख्य पुजारी ह.भ.प. वासुदेव महाराज यांनी आनंद दत्तधाम आश्रमास सदिच्छा भेट दिली.
यावेळी आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य श्री साईनाथ महाराज वसमतकर यांनी वासुदेव महाराज यांचे स्वागत करून अधिक महिन्यानिमित्त सुरू असलेल्या अन्नदान व धोंड्याच्या जेवणाच्या उपक्रमाची माहिती दिली. संपूर्ण अधिक महिनाभर भाविकांसाठी धोंड्याचे जेवण व महाप्रसाद सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असून, हजारो भाविक या अन्नदानाचा लाभ घेत आहेत.
दत्तशिखर संस्थानचे मुख्य पुजारी ह.भ.प. वासुदेव महाराज आणि आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती श्री साईनाथ महाराज वसमतकर या दोन संतांचा झालेला दिव्य समागम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही संतांच्या उपस्थितीने आश्रम परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी दोन्ही संतांनी भक्तांना अध्यात्म, सेवा, अन्नदान आणि मानवतेचा संदेश दिला. “अधिक महिना हा केवळ धार्मिक विधींचा नसून दान, सेवा आणि भक्तीचा महिना आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असून गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे,” असे प्रतिपादन संतांनी केले.
समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी प्रत्येकाने धर्मासोबत मानवतेची कास धरावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. संतांच्या प्रेरणादायी आशीर्वचनांनी उपस्थित भाविक भारावून गेले.
या प्रसंगी आश्रमातील सेवेकरी, भाविक, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
