ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत ३ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश.

उमरखेड तालुक्यातील ४४ गावांच्या पाणीटंचाईवर दिलासा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचा निर्णय.

यवतमाळ प्रतिनिधी : 

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाणीसाठ्यातील ३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांसह जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांनी जिल्हा प्रशासनाकडे परिस्थितीची माहिती देत आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली. उपलब्ध माहितीनुसार, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या ४२३.३२४५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून यापूर्वी ९ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सद्यस्थिती लक्षात घेऊन आणखी ३ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणार असून नदीकाठावरील गावांतील नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होणार आहे.

या निर्णयामुळे उमरखेड तालुक्यातील ४४ गावांमधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks